नवी दिल्ली, प्रतिनिधी :
समाजसेवा, जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रमांमधून गेल्या तीन दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक हिरामण सखाराम निकम यांना World Cultural and Education Organisation या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने "Honorary Doctorate" (मानद डॉक्टरेट) या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दि. ७ जून २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील तसेच लोकप्रिय मालिका "वीर हनुमान" फेम अभिनेते निर्भय वाधवा यांच्या हस्ते हिरामण निकम यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि देशभरातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
हिरामण सखाराम निकम यांनी गेल्या ३० वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनकल्याणकारी क्षेत्रात सातत्याने कार्य केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविणे, गरजू विद्यार्थ्यांना मदत, सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणे, विविध जनजागृती मोहिमा राबविणे तसेच समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणे यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
त्यांच्या निःस्वार्थ सेवाभाव, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत World Cultural and Education Organisation या संस्थेने त्यांना या सर्वोच्च सन्मानाने गौरविले आहे. हा पुरस्कार केवळ हिरामण निकम यांचाच नव्हे, तर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आणि समाजसेवेच्या मूल्यांचा गौरव असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
पुरस्कार स्वीकारताना हिरामण निकम यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबीय, सहकारी आणि समाजातील सर्व घटकांना समर्पित करत भविष्यातही समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
समाजसेवा क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्राप्त झालेला हा मानद डॉक्टरेट पुरस्कार अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
.jpeg)
टिप्पणी पोस्ट करा