Featured

news

३६ टक्के परताव्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक; शिवम असोसिएट्सचा प्रमुख अटकेत*

३५ हजारांहून अधिक गुंतवणूकदार अडकले; ५० कोटींहून मोठ्या घोटाळ्याची शक्यता*

RBI, SEBI ची परवानगी नसतानाही आर्थिक व्यवहार; बेलगावात मोठा पाँझी स्कॅम उघड*

निवृत्त सैनिक, शेतकरी आणि पेन्शनधारकांचे कोट्यवधी रुपये धोक्यात*

शिवम असोसिएट्स प्रकरण CID कडे जाण्याची शक्यता; तपासाला वेग*





बेलगावमध्ये एक मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला असून, शिवम असोसिएट्स अर्थात Accumen या वित्तीय संस्थेचा संस्थापक शिवानंद नीलण्णावर याला पोलिसांनी अटक केली आहे.


तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कोणतीही वैधानिक परवानगी नसताना या संस्थेने सर्वसामान्य नागरिकांकडून ३६ टक्के परताव्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा केल्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी किंवा अन्य कोणत्याही शासकीय संस्थेची परवानगी नसतानाही ही आर्थिक योजना चालवली जात होती.



प्राथमिक तपासात ३५ हजारांहून अधिक नागरिकांनी या योजनेत गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात निवृत्त सैनिक, पेन्शनधारक आणि जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


बेलगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, या प्रकरणातील रक्कम ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता असून, तपास CID कडे सोपविण्याचा विचार सुरू आहे.


पोलिसांनी आणि विविध शासकीय विभागांनी संस्थेच्या कार्यालयांवर आणि संस्थापकाच्या निवासस्थानी छापे टाकून डिजिटल व कागदपत्रीय पुरावे जप्त केले आहेत. या सर्व कागदपत्रांची सखोल छाननी सुरू असून, अनेक बँक खाती गोठविण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.


पोलिस आयुक्त भुषण गुलाबराव बोरसे यांनी सांगितले की, आरोपी तपासात सहकार्य करत नसून त्याच्याकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.


दरम्यान, फसवणुकीचे बळी ठरलेल्या नागरिकांनी जिल्हा आर्थिक फसवणूक कक्षाकडे तक्रारी दाखल करून आपल्या पैशांच्या परताव्यासाठी पुढे यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


एका बाजूला बँका ६ ते ७ टक्के व्याज देत असताना ३६ टक्के परताव्याचे आश्वासन देणाऱ्या योजनांबाबत नागरिकांनी सावध राहावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


रिपोर्ट : गिरीश गोखले

जिल्हा प्रतिनिधी, सोलापूर

पोलीस माझा न्यूज

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने